नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यासाठी मा.खा.अशोक नेते मुख्यमंत्र्यांना भेटले

मुख्यमंत्र्यांचे दुरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

गडचिरोली : सततच्या मुसळधार पावसाने आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे, तसेच गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व द‌रवाजे उघडून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली-चिमूर क्षेत्रातील अनेक नदी-नाल्यांना पूर येऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. याचबरोबर शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी माजी खासदार अशोक नेते यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी संजय दैने यांना फोन करून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

भाजपच्या बैठकीसाठी माजी खा.नेते मुंबईत होते. दरम्यान गडचिरोली जिल्हा आणि लगतच्या जिल्ह्यांमधील पूरपरिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी नुकसानग्रस्तांना लवकर मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. सततच्या पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. पूर आल्याने काही शेतकऱ्यांची ज‌नावरे पाण्यात वाहुन गेली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे अशोक नेते यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने याची दखल घेतली. यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम हेसुद्धा उपस्थित होते.