गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी पत्नी अर्चना नेते व मुलगी आशिता यांच्यासह मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर नेते यांनी गडचिरोली, चामोर्शी, भेंडाळा, दोटकुली, कान्होली, मुरखळा (माल) अशा विविध ठिकाणच्या मतदान केंद्रांवर भेटी देऊन मतदान प्रक्रियेचे निरीक्षण केले आणि भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करत त्यांना मतदानासाठी जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या भेटी त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. त्यांची सक्रिय उपस्थिती स्थानिक पातळीवरील पक्षाच्या कार्याला ऊर्जा देणारी ठरली. मा.खा.नेते यांनी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावून देशाच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही केले.
यावेळी नेते यांच्यासोबत भाजपचे जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सामाजिक नेते नंदु काबरा, ओबीसी नेते तथा भाजपचे युवा नेते भास्कर बुरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.