देसाईगंजमधील भव्य मारबत मिरवणूक ठरली आकर्षण

नवशक्ती युवा संघटनेचे आयोजन

देसाईगंज : शहरात जनशक्ती युवा संघटनेच्या पुढाकाराने प्रथमच पारंपरिक मारबत उत्सव यावर्षी भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. दुपारी शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या रॅलीने मोठ्या संख्येने युवा वर्ग सहभागी झाला होता. ढोल-ताशांच्या गजरात, झांजपथकांच्या नादावर थिरकणारे युवक, विविध पारंपरिक वेशभूषेतील महिला व मुलांचा सहभाग यामुळे या मारबत उत्सवाचे आकर्षण वाढले. महाकाल, काली माता, कालभैरव, टेडी बेअर यांसारख्या पारंपरिक व आधुनिक देखाव्यांनी सजवलेले रथ, पारंपरिक वेशभूषांतील युवक-युवती आणि कलावंत यांचे देखावे नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरले.

या सोहळ्याचे उद्घाटन आमदार रामदास मसराम, माजी आमदार कृष्णा गजबे, माधुरी मडावी तसेच ज्येष्ठ नागरिक परसराम टिकले, राजेंद्र बुल्ले, नरेंद्र गजपुरे यांच्या हस्ते पूजन करून झाले. यावेळी जनशक्ती युवा संघटनेचे अध्यक्ष पिंकू बावणे, उपाध्यक्ष नितीन घुले यांच्यासह भूमीत मोगरे, सुनील चिंचोळकर, अमित सलामे, अमोल पत्रे, राहुल सिडाम, संदीप मॅकलवार, तेजस मरसकोल्हे, अशोक देशमुख, अनिल निमजे, भूमेश्वर निमजे, नाशिक नागापुरे, मयूर नागलवाडे, मंगेश गराडे, शुभम तोडकर, लक्की बिरहा, सिव्हिल वासनिक, पिंटू बोरकर, विष्णू गराडे, मयूर सिडाम आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण रॅली शिस्तबद्ध व शांततेत पार पडली. प्रशासनाकडून व नागरिकांकडून या शिस्तबद्ध आयोजनाचे कौतुक करण्यात आले.