विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघताहेत गणेश मंडप

घरगुती दराने दिला वीज पुरवठा

गडचिरोलीत अनेक मंडळांनी मंडपाच्या परिसरात केलेली अशी आकर्षक रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

गडचिरोली : जिल्ह्यात 10 दिवसीय गणेशोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे दोन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर थोडे विरजण पडले होते. मात्र आता ठिकठिकाणच्या गणेश मूर्तींसह विविध देखावे आणि मंडपाच्या परिसरात केलेली आकर्षक व विविधरंगी रोषणाई पाहण्यासाठी जिल्हाभरातील नागरिक सहकुटुंब घराबाहेर पडत आहेत. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्ह्यात 481 सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरूपात वीज जोडणीची सुविधा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी घरगुती वीज दर आकारले जात असल्यामुळे अधिकृतरित्या वीज जोडणी घेण्यासाठी अनेक मंडळं पुढे आली आहेत. यामुळेच यावर्षी अनेक मोठ्या मंडळांनी विद्युत रोषणाईचा झगमगाटही वाढविला आहे.

तात्पुरत्या वीज जोडणीसाठी गणेश मंडळांना अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम आॅनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत मिळणार आहे. त्यामुळे मंडळांनी अनामत रक्कम आॅनलाईन पद्धतीनेच भरावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.