गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन संशोधन उत्सव ‘अविष्कार’ या स्पर्धेचे आयोजन गोंडवाना विद्यापीठात करण्यात आले. विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित या संमेलनात गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या प्रयोगांचे प्रदर्शन मांडत आपला अविष्कार सादर केला.
या प्रदर्शन व स्पर्धेचे उद्घाटन नागपूरच्या व्हीएनआयटीचे प्रा.दिलीप पेशवे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे तर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण उपस्थित होते.
आपल्या परिसरात अविष्काराची नितांत आवश्यकता आहे. डोक्यामध्ये येणाऱ्या आयडियाचे एम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, काहीतरी वेगळे करण्यासाठी डोक्याची जुगाड टेक्नॉलॉजी वापरण्याची गरज आहे. आपल्याला सगळ्यात जास्त ज्ञान देणारी ही आपली आई आहे. आईकडून जेवढे शिकता येईल तेवढे शिकून घ्या, असे आवाहन करताना तुमच्याकडे असलेल्या कौशल्यांना पैलू पाडता यावे, यासाठी या अविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आपले संशोधन समाजातील सर्व वर्गांपर्यंत आपण नेऊ शकतो का, त्यासाठी काय करता येईल, आपल्या या संशोधनाचा समाजाला उपयोग कसा करता येईल यादृष्टिने प्रयत्न करा, असा सल्ला यावेळी उद्घाटक प्रा.दिलीप पेशवे यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाच्या संचालक डॉ.प्रिया गेडाम यांनी केले.