येणारी पिढी आई-वडील, नात्यागोत्यांसाठी जगेल का?

अरविंद सावकारांनी केला सवाल

गडचिरोली : युवा पिढीने आई-वडीलांनी दिलेल्या शिकवणीची जाणीव ठेवली तर त्यांच्या जीवनाला नक्कीच चांगली दिशा मिळते, पण वाट चुकली तर कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहात नाही. येणारी पिढी आई-वडील, नात्यागोत्यांसाठी जगेल का? असा सवाल उपस्थित करत, सोशल मीडियाच्या जगात वावरणाऱ्या लोकांना पाहून ही माणसं केवळ स्वत:साठीच जगतात की काय, अशी भिती वाटत असल्याची भावना ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी व्यक्त केली.

माजी आमदार नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अरविंद सावकारद्वारा लिखित ‘परंपरा लोकहिताची’ या स्मरणिकेचे प्रकाशन आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या 2024-25 च्या जिल्हा गौरव पुरस्काराचे वितरण शुक्रवारी (दि.22) बँकेच्या मुख्य शाखेत पार पडले. रिमझिम पाऊस सुरू असताना भरगच्च उपस्थितीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाजी चुधरी यांना हा पुरस्कार देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद सावकार पोरेड्डीवार तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते चुधरी यांना 51 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांना प्रतिकुटुंब 75 हजार रुपयांची सानुग्रह मदत देण्यात आली. योगायोगाने याच दिवशी (दि.22 जुलै) प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

मंचावर नागरी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, डॅा.देवराव होळी, डॅा.नामदेव उसेंडी, गडचिरोलीचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, पद्मश्री डॅा.परशुराम खुणे, लॅायड्स मेटल्सचे संचालक ले.कर्नल (नि.) विक्रम मेहता, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी अध्यक्ष प्रशांत वाघरे, किसनराव खोब्रागडे तसेच बँकेचे सर्व संचालकगण मंचावर विराजमान होते.

यावेळी कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे म्हणाले, पोरेड्डीवार परिवाराने कर्तृत्वाची परंपरा नामदेवराव यांच्यापासून आतापर्यंत जपली. या परिवाराने केवळ वडीलांचा वारसा जोपासला नाही, तर तो आणखी पुढे नेला. राजकारण अनेक लोक करतात, पण या परिवाराने 80 टक्के समाजकारण केले, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.

अरविंद सावकार यांनी आपल्या वडीलांच्या (माजी आ.स्व.नामदेवराव) आठवणींना उजाळा देत त्यांची स्वभाववैशिष्ट्ये सांगितली. 1950 च्या दशकात बाहेर महागड्या फोर्ड गाडीतून फिरताना शेतावर सायकलने जाऊन कामं करण्याचा साधेपणाही त्यांच्या अंगी होता. जमिनीशी नाते जोडण्याची शिकवण त्यांनी आपल्या वागणुकीतून दिली. वडीलांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच आपण अनेक संकटांना तोंड देत टिकून असल्याचे ते म्हणाले.

यावेळी सत्कारमूर्ती दादाजी चुधरी, माजी आ.कृष्णा गजबे, डॅा.देवराव होळी, पद्मश्री परशुराम खुणे, प्रा.रमेश बारसागडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना सावकार परिवाराकडे पैशाच्या श्रीमंतीसोबत मनाची श्रीमंतीही मोठी असल्याचे म्हटले. लाखो लोकांनी यांच्या बँकेत अकाऊंट उघडले, पण यांनी लोकांच्या हृदयात अकाऊंट उघडल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकात बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांनी आपल्या आजोबांपासून सुरू असलेल्या वाटचालीवर प्रकाश टाकला. आजोबांपासून सुरू असलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच आम्ही सामाजिक योगदान देत असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॅा.नरेंद्र आरेकर यांनी तर आभार प्रदर्शन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले.