गडचिरोली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्तीचा संदर्भ, महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य, तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगे महाराज यांच्या जयंती वर्षानिमित्त सामाजिक समता सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि संविधानिक मुल्यांची जनजागृती करण्यासाठी जिल्हाभर विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
सामाजिक समता सप्ताहानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रती प्रत्येक कुटुंबापर्यंत वितरित करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, महाड चवदार तळे सत्याग्रह आणि मानवी हक्क यावर व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. संत गाडगे महाराज यांच्या कार्यावर आधारित वक्तृत्व, निबंध आणि रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार असून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ देण्यावर भर राहणार आहे.
दि.10 एप्रिल रोजी पंचायतस्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. 12 एप्रिल रोजी भारतीय संविधान, त्याची निर्मिती, मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी व्याख्याने आयोजित करण्यात येतील. महिला मेळाव्यांच्या माध्यमातून डॉ.आंबेडकर यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची माहितीही देण्यात येणार आहे.
दि.13 एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रबोधन शिबिर, विद्यार्थ्यांसाठी रक्तदान शिबिर आणि स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच जात पडताळणी कार्यालयामार्फत ऑनलाइन पद्धतीने जात वैधता प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. 14 एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासकीय कार्यालये व शाळांमध्ये अभिवादन कार्यक्रम पार पडतील. त्याच दिवशी सायंकाळी सर्वधर्मीय सामाजिक सलोखा मेळावा आणि महाड चवदार तळे सत्याग्रहावरील व्याख्यानांचे आयोजन करून सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे.
सामाजिक समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजात समता, बंधुता आणि सामाजिक सलोखा दृढ करण्यासोबतच संविधानिक मूल्यांविषयी व्यापक जागृती निर्माण होईल, असा विश्वास समाजकल्याण विभागाने व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध घटकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
































