अन्नाची नासाडी टाळण्यासाठी लॅायन्स क्लबने केली शाळांमध्ये जाऊन जागृती

गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांना सांगितले महत्व

गडचिरोली : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत; परंतु जगभरात कोट्यवधी लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. एकीकडे अशी परिस्थिती असताना, दुसरीकडे फार मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. यावर जनजागृती करण्यासाठी लॅायन्स क्लब गडचिरोलीच्या वतीने 19 जुलैला अन्नाची नासाडी होऊ नये, हा संदेश समाजाला देण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.

कॉम्प्लेक्स येथील कमलताई मुनघाटे हायस्कूल, प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेन्ट, गोकुळ नगर येथील सावित्रीबाई फुले, भगवंतराव हिंदी हायस्कूल, वसंत विद्यालय, राणी दुर्गावती हायस्कूल इत्यादी शाळांमार्फत जनजागृती करून विद्यार्थ्यांना अन्नाचे महत्व पटवून देण्यात आले.

अन्नाची नासाडी म्हणजे फक्त अन्न वाया घालवणे नव्हे, तर धान्य, फळ-भाज्या पिकवण्यासाठी लागलेली मजुरी, श्रम, गुंतवणूक आणि स्त्रोतांचे नुकसान आहे. या आपल्या बेजबाबदारपणामुळे आपण ग्रीन हाऊस उत्सर्जन आणि क्लायमेट चेंजसाठी जबाबदार ठरतो. अन्नाची नासाडी हा फक्त सामाजिक प्रश्न नाही तर पर्यावरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अन्नाची नासाडी रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलले गेलेच पाहिजे आणि ती काळाची गरज असल्याचे लॅायन्सच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आवश्यक तेवढेच अन्न शिजविणे, जास्तीचे अन्न जर खायला सुरक्षित असेल तर भुकेलेल्या गरिबांना दान करणे, जास्तीच्या अन्नाचे पुनर्वितरण करणे असा संदेश शाळांमधून देण्यात आला.

यावेळी क्लबचे संस्थापक नारायण पद्मावार, अध्यक्षा मंजुषा मोरे, सचिव नितीन चंबुलवार, झोन अध्यक्ष दीपक मोरे, कॅबिनेट ऑफीसर नादीर भामानी, स्मिता लडके, शालिनी कुमरे, डॉ.सुरेश लडके, वसंत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता कामडी, सावित्रीबाई फुले शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चिलमवार, राणी दुर्गावतीच्या मुख्याध्यापिका वैशाली मडावी आणि भगवंतराव हायस्कूलमधील शिक्षकवृंद उपस्थित होते.