गडचिरोली : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीच्या अनुषंगाने देशभरात सुरू असलेल्या दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या वतीने येथील गोंडवाना विद्यापीठात भ्रष्टाचार निर्मूलन कार्यशाळा घेण्यात आली.
कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यात जनजागृती होण्याकरीता लाच तथा भ्रष्टाचाराबाबत मार्गदर्शनपर चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे अधिकारी विक्रांत सगणे, पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यशाळेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्य, उद्देश, तथा लोकसेवकांचा समाजातील भ्रष्टाचार, लाचेचे प्रकार, त्यांचे दुष्परिणाम, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. लाच मागणी अथवा भ्रष्टाचाराबाबत तक्रार कशी करावी, याबाबतही अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
            































