गडचिरोली : जिल्ह्यातील विविध शासकीय बांधकामांचे कंत्राट मोठ्या प्रमाणात बाहेर जिल्ह्यातील कंत्राटदार कंपन्यांना दिल्या जाते. त्यांच्याकडून कामाचा दर्जा ठेवला जात नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील कंत्राटदारांना काम मिळत नाही. स्थानिक कंत्राटदार असल्यास जिल्ह्यातील कामे चांगले करण्याची बांधिलकी असते. त्यामुळे दर्जा उत्तम ठेवला जाऊ शकतो, अशी सूचना आझाद समाज पक्षाने निवेदनातून केली आहे.
आझाद समाज पार्टीने काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यान अनेक गावातून त्यांना रस्त्याविषयी तक्रारी मिळाल्या. अनेक ठिकाणी कामांचा दर्जा निकृष्ट आढळला. त्यानुसार संबंधित विभागाकडे तक्रारीही दाखल केल्या, परंतु योग्य ती कारवाई न झाल्याने कंत्राटदारांचे मनोबल वाढत आहे, असा आरोप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
अनेक विभागातील कामे काही अधिकारी आपल्या नातेवाईक किंवा परिचित ठेकेदारास देत असतात. अनेक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक व सरपंच हे मिळून काम करतात. त्यांचे निरीक्षण करणारी कोणतीही समिती किंवा यंत्रणा नसल्याने कुणाचे त्यांना भय नसते. त्यामुळे कामांवर देखरेख ठेवणारी एक निरीक्षण समिती असावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.