गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव आणि सामाजिक क्षेत्रात वेळोवेळी योगदान देणारे देशभक्त म्हणून सुपरिचित असलेले अझिझ नाथानी यांना यावर्षीचा गडचिरोली गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. 6 जानेवारीला प्रेस क्लबतर्फे आयोजित समारंभात नाथानी यांना सदर पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी (6 जानेवारी) पत्रकार दिन आणि गडचिरोली गौरव पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे.
अझिझ नाथानी हे गेल्या 30 वर्षांपासून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गडचिरोलीतील विद्यार्थी गरिबी आणि पैशांच्या कमतरतेमुळे चांगल्या दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेण्यासाठी महानगरात जाऊ शकत नाही, हे लक्षात आल्यावर 1972 मध्ये त्यांचे चुलत बंधू अलाउद्दीन नाथानी आणि डॉ.लखानी तथा इतर चार जणांनी प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्यातून प्लॅटिनम ज्युबिली स्कूलला सुरूवात झाली. गडचिरोली जिल्ह्यातील ही पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा गेल्या 50 वर्षांपासून या आदिवासीबहुल जिल्ह्यात सक्रियच राहून शिक्षण क्षेत्र समृद्ध करत आहे.
शैक्षणिक व सामाजिक योगदान
प्लॅटिनम ज्युबिली एज्युकेशन सोसायटीचे महासचिव म्हणून अझिझ नाथानी यांनी आगा खान एज्युकेशन सर्व्हिसेस, इंडिया आणि लंडनस्थित शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक सुविधा व शाळेचा अभ्यासक्रम विकसित केला. या शाळेतून अनेक आयएएस, आयपीएस अधिकारी, सीए, डॉक्टर, अभियंते, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर व्यावसायिक उदयास आले आहेत. नाथानी हे सामाजिक योगदानातही अग्रेसर आहेत. ते राष्ट्रीय आपत्ती सहाय्य आणि प्रतिसाद पथकाचे (NDART) सदस्य होते. 2005 च्या जम्मू आणि काश्मीर भूकंपादरम्यान, नाथानी यांनी संस्थेने दत्तक घेतलेल्या उरी जिल्ह्यातील चार गावांमध्ये प्रत्यक्ष मुक्काम करत सेवाकार्य केले. देशाच्या नियंत्रण रेषेपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतान डाकी येथे तंबू, ब्लँकेट आणि अन्न वाटण्यात योगदान दिले. नोटाबंदीच्या काळात लोकांना बँकांमधून पैसे काढण्यास मदत केली. तासनतास रांगेत उभे राहणाऱ्यांना पाणी आणि इतर आवश्यक पदार्थ उपलब्ध करून दिले. कोविड-19 साथीच्या काळात असंख्य पीपीई किट उपलब्ध करून दिल्या. त्यांचे देशप्रेमही अभिमानास्पद आहे. शाळेवर 24 तास फडकत राहणारा जिल्ह्यातील सर्वात उंच राष्ट्रध्वज त्यांनी लावला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून प्रेस क्लबच्या वतीने त्यांचा गडचिरोली गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार असल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे यांनी कळविले.
































