नक्षलमुक्त वातावरणात भरली जंगलात बाबलाईदेवीची जत्रा

प्रथा, परंपरा, संस्कृतीची झलक

भामरागड : तालुका मुख्यालयापासून 5 कि.मी. अंतरावर बेजुरच्या जंगलात 100 वर्षांपासून सुरू असलेली आदिवासींची परंपरागत बाबलाईदेवीच्या तीन दिवसीय जत्रेची सांगता झाली. श्रद्धेपोटी काही महिलांच्या अंगात देवी येण्याचा प्रकार सोडल्यास या जत्रेत आदिवासी समाजाच्या अनेक चांगल्या प्रथा-परंपरांची झलक दिसून आली. मोठ्या संख्येने महाराष्ट्रासह लगतच्या छत्तीसगडमधून भाविक येऊनही कोणतीही गैरसोय झाली नाही.

नक्षलमुक्त वातावरणाचा अनुभव

भामरागड पट्टीतील पारंपरिक गोटूल समिती आणि सर्व ग्रामसभा यांच्या वतीने ‘बाबलाई माता वार्षिक पूजा आणि पारंपरिक संमेलनाचे आयोजन केले जाते. एकेकाळी दक्षिण गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या हालचालींचे केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या या भागात बेजुर येथे वर्षातून एकदा ही मोठी जत्रा भरते. पूर्वी या भागात लग्न समारंभ, आठवळी बजारात माओवाद्यांकडून हिंसक कारवाया करुन दहशत निर्माण केली जात होती. त्यामुळे दरवर्षी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला जातो. मात्र यावर्षी नक्षलमुक्त वातावरणात पोलीस बंदोबस्ताशिवाय मोठ्या उत्साहात ही जत्रा शांतपणे पार पडल्याचे दिसून आले.

शेकडो लोकांनी फेडले नवस

दरवर्षी नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात हा तीन दिवसीय जत्रा महोत्सव आयोजित केला जातो. आदिवासींचे दैवत असलेल्या बाबलाई देवीचे मंदिर बेजुर गावापासून 3 किमी अंतरावरील कोंगा पहाडीवर आहे. पायदळ, दुचाकी, चारचाकी वाहनाने अथवा जसे जमेल तसे भाविक पहाडीजवळ पोहोचून पूजाअर्चा करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. याही वर्षी भामरागड, अहेरी, एटापल्ली, धानोरा, कुरखेडा तालुक्यासह छत्तीसगडमधील हजारो आदिवासी व बिगर आदिवासी भाविकांनी मनोभावे बाबुलाई मातेचे दर्शन घेतले. बुधवारी भामरागड पट्टीतील सर्व पेरमा, भूमिया, गायता, कोतवाल, मांजी यांनी एकत्र येऊन पहिल्या दिवशी दरवाजा पूजेनंतर जत्रेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी 2 जानेवारी रोजी प्रथम मंदिरात नारळ, शेंदूर, कुंकू, अगरबत्ती लावून पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर नैसर्गिक पद्धतीने बेजुर गडीपूजा व भामरागड येथील गडात शस्त्रपुजा, कोंबडा, बोकडाचे बळी देऊन पूजापाठ करण्यात आला. त्यानंतर सर्व भाविकांना दर्शनासाठी परवानगी देण्यात आली. यावेळी भाविकांनी मनोभावे पूजा करून नवस फेडले. तिसऱ्या दिवशी निसर्गरम्य वातावरणात परिवारासोबत वनभोजनानंतर जत्रेची सांगता झाली. या पुजेदरम्यान काही महिलांच्या अंगात देवी संचारण्याचे प्रकारही घडले. अशा महिला केस मोकळे सोडून नाचताना दिसत होत्या.

आदिवासींच्या रितीरिवाजावर खुले चर्चासत्र

बाबलाई देवीच्या जत्रेनिमित्त ग्रामसभा संघाच्या वतीने जत्रेसाठी जमलेल्या नागरिकांचे खुले चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात आदिवासींच्या अधिकारांबद्दल जागृती करण्यात आली. भामरागड पट्टीअंतर्गत आदिवासी व इतर पारंपरिक समुदायाच्या प्रथा, परंपरा, रीतिरिवाज, संस्कृती, निसर्ग व यासंबंधीचे कायदे, याविषयी व्यापक चर्चा यात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामसभा अध्यक्ष, सचिव, भामरागड पट्टीतील पारंपरिक गोटुल समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

आदिवासी बांधवांकडून हे शिकण्यासारखे

हजारो आदिवासी बांधवांसह इतर समाजातील भाविकांनी या तीन दिवसीय जत्रेत मुक्कामी राहून मनोभावे दर्शन घेतले. हजारो भाविकांच्या भोजनाची व्यवस्था पंगत बसवुन केली होती. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांना खरेदीसाठी विविध दुकाने सजली होती. यादरम्यान तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीही पहायला मिळाली. आदिवासींचा लोकप्रिय नृत्य प्रकार असलेल्या रेला नृत्यात तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला. आरोग्य विभागाकडून रोगनिदान शिबिराचे आयोजन केले होते. स्वच्छतेची जबाबदारी नगरपंचायत प्रशासनाकडून पार पाडण्यात आली. भामरागडमध्ये आदिवासी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या आदिवासी महोत्सवात लाखो रुपयांची उधळण झाली, पण नागरिकांना साधे पिण्याचे पाणीही मिळत नव्हते. पण आदिवासींच्या पारंपरिक जत्रेत मात्र कोणतीही गैरसोय झाली नाही. त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून काही शिकावे, अशा प्रतिक्रिया भाविकांमध्ये उमटत होत्या.