गडचिरोली : अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (PM-Kisan) योजनेचा 22 वा हप्ता शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पी.एम.किसान योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी देय असलेल्या 22 व्या हप्त्याकरिता एकूण 1 लाख 54 हजार पात्र शेतकरी निश्चित करण्यात आले आहेत. यातील शेतकरी लाभार्थ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये प्रमाणे थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) वितरित करण्याची प्रक्रिया राबवण्यात आली.
आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 20 व्या हप्त्यापोटी 77,718 शेतकऱ्यांना 15 कोटी 54 लाख 36 हजार रुपये आणि 21 व्या हप्त्यापोटी 44,250 शेतकऱ्यांना 8 कोटी 85 लाख रुपये वितरित करण्यात आले होते. 21 व्या हप्त्याच्या वेळी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत 22 व्या हप्त्यासाठी तिप्पटपेक्षा जास्त शेतकरी पात्र ठरले आहेत हे विशेष.
ज्या शेतकऱ्यांचे इ-केवायसी पूर्ण आहे, बँक खाते आधारशी संलग्न आहे आणि भूमी अभिलेख नोंदणी पूर्ण आहे, अशाच पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दर चार महिन्यांनी दिला जात असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
































