अहेरी : येथील पटवर्धन मैदानात स्व.भगवंतराव महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भगवंतराव मेमोरियलच्या वतीने 18 ते 26 जानेवारीपर्यंत आयोजित क्रिकेट टुर्नामेंटचा बक्षीस वितरणाने समारोप करण्यात आला. 26 जानेवारीला अंतिम सामना खेळविण्यात आला. यात बल्लारपूरचा संघ विजेता, तर अहेरी सी.सी. संघ उपविजेता ठरला. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जामगाव सी.सी. यांनी पटकाविले. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान अहेरी कृषी उत्पन्न समितीचे उपाध्यक्ष रविंद्रबाबा आत्राम होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य तथा युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम, वैद्यकीय अधीक्षक डॉ.कन्ना मडावी, मुख्याधिकारी गणेश शहाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, प्रमोद बेझलवार, विनोद पुसालवार, पितांबर कुळमेथे, कौसर खान, प्रणय येगोलपवार आदी उपस्थित होते.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या वतीने 1 लाख 11 हजार 111, तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सिनेट सदस्य तनुश्री आत्राम व हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्याकडून संयुक्तपणे 77 हजार 777 रुपये रोख, तसेच तृतीय पारितोषिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या वतीने 33 हजार 333 आणि चषक मंडळाच्या वतीने देण्यात आला. याशिवाय इतर वैयक्तिक आकर्षक बक्षिसेसुद्धा देण्यात आली.
क्रिकेट सामन्यांचे उत्कृष्ट समालोचन बबलू सडमेक, विनोद पुसालवार, प्रणय येगोलपवार यांनी, तर पंचाची भूमिका संतोष बेझंकीवार, राकेश सुंकेवार, गणेश ढोके, तसेच स्कोअरर म्हणून पराग रामटेके यांनी जबाबदारी सांभाळली. या सामन्यांच्या यशस्वितेसाठी अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य पुसालवार, योगेश दंडीकेवार, तसेच मंडळाचे अध्यक्ष हितेश मेकलवार, सचिव सुरज कोसरे, उपाध्यक्ष कपिल झाडे, कोषाध्यक्ष निखिल दुर्गे आदी पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
































