गडचिरोली : आदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणात बंजारा, धनगर किंवा इतर कोणत्याही समाजाच्या घुसखोरीला कडाडून विरोध करण्यासाठी बुधवारी गडचिरोलीत आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. यात जिल्हाभरातून हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यात सत्ताधारी आणि विरोधातील अशा सर्वच पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आदिवासी सेवक डॅा.देवाजी तोफा यांच्या नेतृत्वात धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात सर्व आदिवासी बांधव एकत्रित जमले. तेथून मोर्चाला सुरूवात झाली. ‘जो पक्ष बोगस की बात करेगा, आदिवासी उसका साथ छोडेगा’ अशा व इतर घोषणा देत हा लांबलचक महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाडेपट्ट्याने देण्यात येतील” या वक्तव्याचा निषेध आणि इतर समाजाला आदिवासी आरक्षण देण्याच्या विरोधात आज गडचिरोली शहरात आदिवासी समाजाकडून शिवाजी महाविद्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.

या मोर्चात गडचिरोलीचे आमदार डॅा.मिलिंद नरोटे, आरमोरीचे आमदार रामदास मसराम, माजी आमदार डॅा.देवराव होळी, डॅा.नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, दीपक आत्राम, माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, ग्रामसभेचे सैनू गोटा, माधव गावळ, आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष घनश्याम मडावी, युवक काँग्रेसचे विश्वजित कोवासे, अमरसिंग गेडाम यांच्यासह जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते, हजारो आदिवासी महिला-पुरूष सहभागी झाले होते.












