गडचिरोली : सेंट्रल इंडिया रायडिंग कॅाम्युनिटी ग्रुपअंतर्गत चंद्रपूर येथील बड्डास राईड ग्रुपच्या ३५ वर बाईकर्सने गडचिरोलीच्या शहीद पोलिस जवानांच्या शौर्य स्थळाला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. बाईक रायडर अंकुश राऊत यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हे बाईकर्स गडचिरोलीत आले होते.
नक्षलवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या गडचिरोलीतील पोलिस जवानांच्या स्मरणार्थ, त्यांची गौरवगाथा सांगण्यासाठी गडचिरोलीतील सी-६० पथकाचे जवान दरवर्षी देशाच्या वेगवेगळ्या भागात बाईकने शहीद सन्मान यात्रा काढतात. त्यांची भेट घेऊन बड्डास ग्रुपच्या रायडर्सने माहिती जाणून घेतली. यावेळी गडचिरोली पोलिस दलाचे बाईक रायडर किशोर खोब्रागडे, देवा अडोले, रोहित गोंगले, निखिल दुर्गे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना शहीद पोलिसांची गौरवगाथा सांगितली.
सर्व बाईक रायडर्सने पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शौर्य स्थळावर आणि शहीद स्मारकावर श्रद्धांजली वाहिली. यानंतर या रायडर्सने कॅाम्प्लेक्स ते बस स्टँड, सेमाना आणि कोर्ट चौक अशी बाईक रॅली काढून गडचिरोलीकरांचे लक्ष वेधले.