दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत

अंध कल्याण सप्ताहाला सुरूवात

प्रभातफेरीत सहभागी दृष्टिहीन विद्यार्थी.

गडचिरोली : ‘अंधारलेल्या वाटेवर ज्ञानाची प्रकाशज्योत पेटवुया…’ ही संकल्पना घेऊन आयोजित अंध कल्याण सप्ताहासाठी राज्यभरातल्या 15 शाळांमधील 350 दृष्टीहीन विद्यार्थी गडचिरोलीत दाखल झाले आहेत. 8 ते 12 जानेवारी या कालावधीत अभिनव लॅान येथे होत असलेल्या या 36 व्या अंध कल्याण सप्ताहासाठी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ व मैत्री परिवार संस्था गडचिरोली यांच्यासह लॅायड्स मेटल्सकडून सहकार्य केले जात आहे.

दृष्टीहीन मुलामुलींना जगण्याचे बळ देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांच्या कलागुणांना वाव देऊन व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणणे, तसेच समाजात विविध क्षेत्रांत सक्षमपणे वावरण्यासाठी त्यांना तयार करणे या उदात्त हेतूने या सप्ताहाचे आयोजन केले आहे.

या शैक्षणिक सप्ताहात राज्यभरातील अंध विद्यालयातील विद्यार्थी विविध स्पर्धांमधून आपले कलागुण सादर करत उपस्थितांचे मन जिंकत आहेत. त्यांच्या कला, वक्तृत्व आणि सादरीकरणातून आत्मविश्वासाचे दर्शन घडत आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यालय नसतानाही मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष निरंजन वासेकर यांनी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या मदतीला धावून येत या सप्ताहाच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावून मानवता व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. या उपक्रमास श्री साई इन्स्टिट्यूट तथा नर्सिंग कॉलेज वाकडी, लॉयडस् मेटल्स लिमिटेड तसेच पोलीस विभाग यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या शैक्षणिक सप्ताहात पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड, हिंगोली तसेच विदर्भातील नागपूर, चंद्रपूर सह राज्यातील 15 जिल्ह्यांमधील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

उत्साहात उद्घाटन आणि प्रभातफेरी

दि.8 जानेवारी रोजी या विद्यार्थ्यांचे शहरातून प्रभातफेरी काढण्यात आली. शैक्षणिक सप्ताहाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचे राज्याध्यक्ष रघुनाथ बारड, तर स्वागताध्यक्ष म्हणून मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष निरंजन वासेकर उपस्थित होते. या शैक्षणिक सप्ताहांतर्गत दि.10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ब्रेल लिपी वाचन, नृत्य तसेच निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत गडचिरोली शहरातील नागरिकांसाठी ‘रोशनी म्युझिकल ग्रुप’, नागपूर यांच्या वतीने ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.11 जानेवारी रोजी ‘मनाचे श्लोक’ व प्रश्नमंजूषा स्पर्धा, तर दि.12 जानेवारी रोजी बक्षीस वितरण व शैक्षणिक सप्ताहाचा समारोप होणार आहे. अंध विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व या प्रेरणादायी कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी गडचिरोली शहरवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.