गडचिरोली : नक्षलग्रस्त भागात तब्बल 34 वर्षे 6 महिने सेवा बजावल्यानंतर येथील पोलीस उपनिरीक्षक सुहास मुरलीधर इरमलवार हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
मंजुषा इरमलवार (पत्नी), ऋतुजा पलाश पुरम (मुलगी) आणि भ्रमर इरमलवार (मुलगा) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधून त्यांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीजवळील ‘सांझाग्राम’ या पुनर्वसन प्रकल्पासाठी सुमारे 40 हजार रुपयांची पुस्तके दान केली.
‘सांझाग्राम’ हा प्रकल्प पीडित व अत्याचारित माता-भगिनींच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या समर्पण प्रतिष्ठानचा उपक्रम आहे. वैयक्तिक दुःखातही अर्थपूर्ण व आनंददायी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणाऱ्या या प्रकल्पास इरमलवार कुटुंबीयांनी दिलेल्या दानामुळे तेथे साकारत असलेल्या ग्रंथालयास मोठे बळ मिळणार आहे.
या पुस्तकदानामुळे आनंदित झालेले समर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल मानकर यांनी समाधान व्यक्त केले. गणेश झाडे यांनी समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने ही पुस्तके स्वीकारली.
सुहास इरमलवार यांच्या जीवनातील दोन महत्त्वपूर्ण दिवस म्हणजे सेवानिवृत्ती (30 जून) आणि जन्मदिन (1 जुलै) हे एका अर्थपूर्ण कृतीद्वारे साजरे करत इरमलवार कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.