Home दैनंदिन बातम्या ‘गोंडवाना मॉडेल’ पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

‘गोंडवाना मॉडेल’ पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

विद्यापीठाच्या उपक्रमांची माहिती

गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि वनव्याप्त भागात गोंडवाना विद्यापीठाने राबविलेले नाविन्यपूर्ण शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आता संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहेत. नागपूरच्या व्ही.एन.आय.टी.संस्थेत झालेल्या ‘विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण’ या विषयावरील राष्ट्रीय संमेलनामध्ये विद्यापीठाने तयार केलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘गोंडवाना मॉडेल : बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी’ या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

या सोहळ्याला शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’चे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, राज्यपालांचे सचिव विजयकुमार नारनवरे (IAS), राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मनाली क्षीरसागर, व्ही.एन.आय.टी.चे संचालक डॉ.प्रेम लाल पटेल आणि आय.आय.एम. (IIM) नागपूरचे संचालक प्रा.भीमराया मैत्री, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुस्तकांचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे (IQAC) प्रकाशित या पुस्तकांचे संपादन आय.क्यु.ए.सी.चे संचालक प्रा.धनराज पाटील यांनी केले आहे. यामध्ये एक ‘कॉफी टेबल बुक’ आणि एका संपादित पुस्तकाचा समावेश आहे. कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने राबविलेल्या 13 विशेष उपक्रमांचा लेखाजोखा या पुस्तकांमध्ये मांडला आहे. यात प्रामुख्याने एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रम, उच्च शिक्षण थेट गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी राबविलेला उपक्रम, व्यसन निर्मूलन शिक्षण पदवी, अशा उपक्रमांचा समावेश आहे.

‘गोंडवाना मॉडेल’ मधील 13 उपक्रम हे स्थानिक समस्यांवर शैक्षणिक आणि संशोधनात्मक उपाय शोधण्याचे फलित आहेत. हे पुस्तक या सर्व प्रयत्नांचा दस्तावेज असून, ग्रामीण विकासासाठी हे मॉडेल देशभर प्रेरणादायी ठरेल, असा मला विश्वास असल्यााचे कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे म्हणाले.

या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी कार्यक्रम अधिकारी स्वप्निल गिराडे, प्रा.डॉ.मनीष देशपांडे आणि गंधर्व पिल्लारे यांच्या चमुने परिश्रम घेतले. संपादक प्रा.धनराज पाटील यांनी या प्रकल्पाच्या यशाबद्दल कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण आणि वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, तसेच सर्व प्रकरणांचे लेखक आणि समन्वयकांचे आभार मानले.