गडचिरोली : नीती आयोगाद्वारे आकांक्षित जिल्हा व तालुका विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘संपूर्णता अभियाना’त गडचिरोली जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक (ब्राँझ), तर आकांक्षित तालुक्यांमधून अहेरी व भामरागड तालुक्यांनीही कास्य पदक मिळविले आहे. या कामगिरीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
आयआयएम नागपूर येथे 2 व 3 ऑगस्ट रोजी आयोजित महसूल परिषदेत हा गौरव सोहळा पार पडला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, सर्व विभागीय आयुक्त व अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
‘संपूर्णता’ अभियान हे नीती आयोगाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश देशातील मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वांगीण विकास घडवून आणणे आहे. जिल्ह्याने 9 ते 11 वयोगटातील बालकांचे लसिकरण, शाळेत विद्युत सुविधा, शाळा सुरू झाल्यावर एक महिन्याच्या आत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे यात 100 टक्के उद्दिष्ट प्राप्त केले. तर तालुकास्तरावर अहेरीत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी, गरोदर मातांना पूरक पोषण आहार, माती परीक्षण करून मृदा आरोग्य कार्ड बनविणे, यात तसेच भामरागड तालुक्यात मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी सोबतच स्वयंसहायता बचत गटांना खेळते भांडवल उपलब्ध करून देणे, या बाबींमध्ये 100 टक्के उद्दिष्टप्राप्ती केली आहे. गडचिरोली जिल्ह्याने या अभियानात केलेल्या प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाला आहे.