गडचिरोली : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा.डॅा.अतिश बन्सोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात एका स्तनकर्करोगग्रस्त महिलेचा तब्बल दिड किलोचा ट्युमर काढण्याची शस्रक्रिया यशस्वी केली. गुंतागुंतीच्या या शस्रक्रियेला गडचिरोलीतील खासगी रुग्णालयाने नकार दिला होता.

प्राप्त माहितीनुसार, सदर 45 वर्षीय महिला रुग्ण गेल्या 4 वर्षांपासून डाव्या स्तनात गाठ असल्याने तीव्र वेदना आणि असह्य त्रास सहन करत होती. या महिलेवर 6 वर्षांपूर्वी अहेरीत शस्रक्रिया (लम्पेक्टॅामी) झाली होती. परंतू पुन्हा ट्युमर वाढला. या महिलेने गडचिरोलीतील चार डॅाक्टरांकडे संपर्क केला, पण या प्रकरणातील गुंतागुंत पाहता सर्वांनी शस्रक्रिया करण्यास नकार दिला होता, असे मेडिकल कॅालेजचे अधिष्ठाता डॅा.अविनाश टेकाडे यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात केलेल्या सीटी स्कॅन तपासणीत सदर ट्युमर 30 बाय 35 सेमी आणि वजन 1.5 किलो असल्याचे आढळले. मेडिकल कॅालेजच्या शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख प्रा.डॅा.अतिश बन्सोड, त्याचे सहकारी प्रा.डॅा.प्रसाद योगेंद्र बन्सोड, प्रा.डॅा.कृणाल चेंडकापुरे, डॅा.अशना नागपाल, डॅा.पंकज कटारिया, डॅा.क्रिनल पारेख आदींनी ही शस्रक्रिया यशस्वी केली. यात भूलतज्ज्ञ डॅा.साखरे व डॅा.मडावी, परिचारिका समीक्षा व ओटी इन्चार्ज कविता नांदगाये यांनीही सहकार्य केले.
ही शस्रक्रिया यशस्वी करण्यासाठी अधिष्ठाता डॅा.अविनाश टेकाडे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.माधुरी किलनाके यांनीही मार्गदर्शन केले. या शस्रक्रियेमुळे गडचिरोलीत कर्करोगाच्या उपाचाराच्या नव्या अध्यायाची सुरूवात झाली असून रुग्णांना आता त्यासाठी नागपुरात जाण्याची गरज भासणार नाही.
































