पेसा क्षेत्रातील 44 उमेदवारांना नियुक्त्या देऊन जिल्हा परिषदेने मारली बाजी

तलाठी भरतीसाठी आजपासून पडताळणी

गडचिरोली : जिल्हा परिषदेतर्फे पेसा क्षेत्रासाठी 37 ग्रामसेवक आणि 7 अंगणवाडी पर्यवेक्षक‌ अशा 44 उमेदवारांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. पेसा क्षेत्रात तातडीने नियुक्ती देण्यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजीच्या शासन आदेशानुसार शनिवार व रविवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या मार्गदर्शनात तातडीने उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करून कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मंगळवारी त्यांना नियुक्तीपत्र देऊन बाजी मारली आहे.

तलाठी पदभरतीसाठी कागदपत्रांची पडताळणी आजपासून

अनुसूचित क्षेत्र (पेसा) तलाठी पदभरतीकरीता निवड यादी व प्रतीक्षा यादी, तसेच जाहीर सुचना जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संकेतस्थळावर (https://gadchiroli.nic.in) 7 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर यादीतील उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.30 वाजतापासून जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे करण्यात येणार आहे.

अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत जाहिरातीनुसार सुरु झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहचल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता, तर काही विभागांमार्फत निवड प्रक्रियेचा निकाल तयार झाला, परंतु जाहीर केलेला नव्हता. पेसा क्षेत्रातील पदे 1 वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली अंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अधिसूचित करण्यास संबंधित विभागांना परवानगी देण्यात आली आहे.

कागदपत्रांच्या पडताळणीनंतर शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर आदेश निर्गमित करण्यात येणार आहेत. कागदपत्र पडताळणीकरीता अनुपस्थित राहिल्यास पुनश्च: संधी देता येणार नसल्याने उमेदवारांनी संकेतस्थळावर दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.