Home दैनंदिन बातम्या रस्त्यालगतच्या कठड्यांना धडकून फिल्मी स्टाईल उडाली भरधाव कार

रस्त्यालगतच्या कठड्यांना धडकून फिल्मी स्टाईल उडाली भरधाव कार

गडचिरोलीत मध्यरात्रीचा थरार

गडचिरोली : चंद्रपूर मार्गावरील कारगिल चौकात गुरूवारी (दि.26) रात्री 11.50 च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक भरधाव कार रस्त्यालगत असलेल्या लोखंडी कठड्यांना (बॅरिकेड्स) धडक देऊन हवेत उडाली. त्यानंतर पालथी पडून फरफटत कारगिल चौकात रस्त्याच्या मधोमध थांबली. एखाद्या चित्रपटातील दृष्य वाटावे अशा या थरारक अपघातात चालक गंभीर जखमी झाला असला तरी तो बचावला आहे.

प्राप्त माहितीनुसार, मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार (क्रमांक MH-31-EK-5991) ही चंद्रपूर मार्गाने शहराकडे भरधाव वेगात येत होती. यावेळी कारमध्ये चालक देव राहुल महात्मे (22 वर्ष) हा एकटाच होता. कारगिल चौकात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती कार डाव्या बाजुच्या कठड्यांना धडक देऊन उडाली आणि उलटून समोरच्या भारावर खाली कोसळली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर दुसरे कोणतेही वाहन किंवा कोणी व्यक्त नसल्याने अनर्थ टळला. मात्र कारचालक गंभीर जखमी झाला. त्याच्या कमरेला व पाठीला गंभीर फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचुर झाला.

चालक मद्यपान करून होता का, हे पोलीस तपासात पुढे येईल. पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहेत.