खनिज वाहतुकीसाठी 85 किमी चारपदरी सीसी रोड बनविणार

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मंजुरी

गडचिरोली : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंगळवारी (दि.27) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात लोहखनिज वाहतुकीसाठी सुरजागड ते चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगावपर्यंतच्या 85.76 किलोमीटर लांबीच्या चारपदरी सुधारित रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली.

समृद्धी महामार्गाच्या विस्ताराअंतर्गत नागपूर–गोंदिया सोबतच भंडारा ते गडचिरोली महामार्गाच्या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विस्तारामुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांशी थेट आणि जलद संपर्क अधिक बळकट होईल.

या बैठकीत गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी नवेगाव-मोरे–कोनसरी–मुलचेरा–हेडरी–सुरजागड या महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांब आणि चारपदरी सिमेंट काँक्रिटकरणास मंजुरी देण्यात आली. हा महामार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे सुरक्षित, वेगवान आणि सुकर वाहतुकीस चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पायाभूत प्रकल्पांची कामे ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी दिले. कोणताही प्रकल्प रेंगाळू नये, तसेच काम सुरू करण्यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या व मंजुरी पूर्ण करूनच अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाचा विस्तार आणि सुरजागड मार्गाच्या चौपदरीकरणामुळे गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, खनिजावर आधारित उद्योग तसेच एकूणच आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.