मिरवणुका-भीमगीतांनी दुमदुमला जिल्हा, उत्साहात तरुणाई थिरकली

जयंतीनिमित्त अभिवादनासाठी गर्दी

गडचिरोली : भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि.14) जिल्ह्यात सर्वदूर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. भीमगीत, आतिषबाजी, आणि मिरवणुकांमधील डीजेच्या तालावर नाचणाऱ्या तरुणाईच्या उत्साहामुळे संपूर्ण जिल्हा भीममय झाल्याचे पहायला मिळाले.

गडचिरोली शहरात कॅाम्प्लेक्स परिसरातील सर्किट हाऊसजवळ नव्याने सुशोभित केलेल्या जागेतील डॅा.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सकाळपासून अभिवादन केले जात होते. शहरातील अनुयायांनी एकच गर्दी केली होती. सामाजकल्याण विभागातर्फे त्या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याशिवाय संध्याकाळी निळ्या पताकांनी सुशोभित केलेल्या गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात विविध भागातून निघालेल्या भीमरॅलींचे एकत्रिकरण झाल्यानंतर हा चौक भीमाच्या लेकरांनी फुलून गेला होता. शुभ्र पांढरे वस्त्र, निळे दुपट्टे, टोप्या परिधान केलेल्या या गर्दीत महिला-मुलीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

जिल्ह्यातील अहेरी, चामोर्शी, आरमोरी, धानोरा, कोरची, देसाईगंज या तालुक्यांतही बाबासाहेबांच्या अनुयायांसह हजारो लोकांनी भीमजयंतीच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होऊन पुतळे, तैलचित्रांपुढे पुष्प वाहून आदरांजली वाहिली.