संतांच्या विचारातच मानवी कल्याण, मान्यवरांचा सूर

संत तुकाराम जयंती महोत्सव

संत तुकारामांची पालखी खांद्यावर घेतलेले काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे.

गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीवर अनेक महान संत होऊन गेले. सर्वच संतांनी मानवी कल्याणाचा मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारातूनच मानवाचे कल्याण साध्य होऊ शकते. त्यामुळे सर्वच समाजातील व्यक्तींनी संतांचा अभ्यास करून त्यांचे विचार आचरणात आणल्यास मानवी जीवनाचे कल्याण होऊ शकते, असा सूर मान्यवरांनी अखिल कुणबी समाज संघटनेच्या वतीने आयोजित संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवात काढला.

येथील अखिल कुणची समाज संघटनेच्या वतीने 2 फेब्रुवारी रोजी संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी समाज संघटनेचे अध्यक्ष ॲड.संजय ठाकरे, तर प्रमुख वक्ते म्हणून पोलीस उपनिरिक्षक नितेश गोहणे, राजश्री नितेश गोहणे उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे, काँग्रेसचे गटनेते सतीश विधाते, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, नगरसेवक प्रा.रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख व्यक्त्या राजश्री गोहणे म्हणाल्या, संत तुकाराम महाराज यांचे विचार केवळ ऐकण्यासाठीच नाही तर त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. ज्या समाजात व ज्या काळात संत तुकाराम महाराज यांनी सर्व मानव जातीला कल्याणाचा मार्ग दाखविला, तोच मार्ग आजही मानवाच्या कल्याणासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने संतांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रमुख व्यक्ते नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर, नितेश गोहणे, ॲड.संजय ठाकरे आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी गडचिरोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुणबी समाजातील इयत्ता दहावी, बारावी व शासकीय सेवेत दाखल झालेल्या युवकांचाही संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.धर्मेंद्र मुनघाटे यांनी, संचालन प्रा.डॉ.पंकज नरूले व मनोज हुलके यांनी, तर आभार राजेश गोहणे यांनी मानले.