उद्योजकांनो या, आम्ही तुमच्या मदतीसाठी सज्ज आहोत

गडचिरोलीत उद्योजक मदत कक्ष

गडचिरोली : औद्योगिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात नवउद्योजकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे ‘उद्योजक मदत कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उद्योग केंद्राच्या समन्वयाने कार्यरत केलेला हा कक्ष जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्याबरोबरच नवउद्योजक, गुंतवणूकदार यांना ‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे सर्वसमावेशक सेवा पुरवणार आहे.

गडचिरोलीत गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, ‘सुलभ व्यवसाय व्यवस्था’ सुधारण्यात हातभार लावणे, तसेच पारदर्शक व कार्यक्षम सेवांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणे. विशेषतः मागास व आदिवासी भागातील औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रीत करणे हा या कक्ष स्थापनेमागील उद्देश आहे.

उद्योजक मदत कक्षाचे मुख्य कार्य

* विविध शासकीय परवाने, मंजुरी व प्रमाणपत्रांसाठी मदत करणारी ‘एक खिडकी प्रणाली’
* गुंतवणूकदारांच्या तक्रारी नोंदवून संबंधित विभागांशी समन्वय साधणे.
* प्रकल्प नियोजन ते अंमलबजावणीपर्यंत मार्गदर्शन.
* महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुलभता कक्ष, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यासारख्या राज्यस्तरीय संस्थांशी समन्वय.
* उद्योजक मेळावे व गुंतवणूक संमेलनांचे आयोजन.
* या उपक्रमातून गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण करणे, स्थानिक उद्योजकता आणि स्वयंरोजगारास चालना देणे.
* रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून स्थलांतराचे प्रमाण कमी करून मागास भागात समावेशक आर्थिक विकासास गती देणे.

राज्य शासनाच्या औद्योगिक धोरणांशी सुसंगत असलेला हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यास औद्योगिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.