शेतमालाच्या हमीभावातील वाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा- खासदार नेते

केंद्राच्या कल्याणकारी योजनांमुळे जीवनमान उंचावले

गडचिरोली : केंद्रात सत्तारूढ असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने यावर्षीही विविध शेतमालाच्या हमीभावात दिलेली घसघशीत वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासाजनक आहे. गेल्या ९ वर्षात सातत्याने हमीभावात वाढ करून या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले आहे, अशी भावना गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केली.

पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या धानाला यावर्षी प्रतिक्विंटल 150 रुपयांची वाढ मिळाली आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवार आले त्यावेळी धानाचे दर 1360 रुपये एवढे होते. त्या तुलनेत आता 823 रुपयांची वाढ मिळून धानाचे दर 2184 वर पोहोचले आहे. याचबरोबर मक्याला 2014 मध्ये 1310 रुपये दर मिळत होता. आता तो 2090 रुपये झाला आहे. कापसाला 2014 मध्ये 3750 रुपये दर होता. तो आता 6620 रुपये झाला आहे. यासोबत सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल अशा सर्वच पिकांच्या हमीभावात मोदी सरकारने वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव देण्याचे आश्वासन या सरकारने पूर्ण केले आहे. त्यामुळे हे सरकार सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हाच संदेश यातून जातो, असे खा.नेते म्हणाले.

शेतकऱ्यांना अनेक वेळा नैसर्गिक आपत्ती, नापिकी अशा संकटांना तोंड द्यावे लागते. अशा संकटातही वेळोवेळी त्यांना सरकारी मदत देऊन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाकडे वळावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासोबत गडचिरोली-चिमूर क्षेत्रात सिंचनाच्या सुविधा वाढण्यासाठी अर्धवट प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांची स्थिती आणखी सुधारल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा.नेते यांनी ‘कटाक्ष’ सोबत बोलताना व्यक्त केला.