गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी सीईओ, डीएचओंची आलदंडीला भेट

6 किमीची पायपीट झालीच नाही

महिलेच्या कुटुंबियांशी चर्चा करताना सीईओ गाडे, डॅा.शिंदे

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात 6 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयात आल्याचे वृत्त वस्तुस्थितीला धरून नसून त्या महिलेला रुग्णवाहिकेतूनच हेडरीच्या रुग्णालयात आणले होते, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी शनिवारी आलदंडी टोला गावाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांशी सविस्तर चर्चा केली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर गरोदर माता ही आलदंडी टोला येथून उपचारासाठी किंवा रुग्णवाहिकेअभावी पायी चालत हेडरीच्या लॅायड्स काली अम्मल रुग्णालयात आल्याची माहिती पूर्णतः चुकीची आहे. वास्तविक, संबंधित महिला ही आलदंडी टोला येथून पेठा येथे एका पुजाऱ्याकडे गेली होती. त्या ठिकाणी तिने रात्री मुक्काम केला होता. दरम्यान, रात्री साधारण 1 ते 2 वाजताच्या सुमारास तिला अचानक त्रास होऊ लागला. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच स्थानिक आशा स्वयंसेविकेला तात्काळ संपर्क करण्यात आला. आशा स्वयंसेविकेने कोणताही विलंब न करता तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली, आणि त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारेच त्या महिलेला हेडरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे 6 किलोमीटरची पायपीट करत रुग्णालयात पोहोचल्याचे वृत्त निराधार व वस्तुस्थितीला धरून नसल्याचे डॉ.शिंदे यांनी स्पष्ट केले.

सदर महिलेच्या गरोदरपणाच्या संपूर्ण कालावधीत आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी गृहभेटी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियमितपणे तिच्या घरी भेट देऊन आवश्यक तपासण्या, आरोग्य स्थितीचे मूल्यमापन तसेच आवश्यक मार्गदर्शन केले होते, असेही डॅा.शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही महिलेच्या गावाला भेट देऊन स्थानिक नागरिक, आरोग्य यंत्रणा व संबंधित घटकांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील माता-बाल मृत्यू प्रकरणांबाबत प्रशासन संवेदनशील आहे. कोणतीही घटना घडल्यास सखोल चौकशी केली जाते. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती तत्काळ सेवा पुरविण्यात आली, प्रशासनाकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे सीईओ गाडे यांनी स्पष्ट केले.

पुजारी-वैदूकडे न जाता रुग्णालयात जा

सीईओ गाडे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, गरोदर माता किंवा कोणत्याही गंभीर आजाराच्या परिस्थितीत पुजारी, वैदू किंवा अंधश्रद्धेवर आधारित उपचारांकडे न जाता थेट शासकीय आरोग्य यंत्रणेकडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका किंवा रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधावा. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास अनेक जीव वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.

या प्रकरणात पुजाऱ्याकडे जाणे, तेथे रात्री मुक्काम करणे आणि त्यानंतर अचानक प्रकृती बिघडणे, हा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्यामुळे नागरिकांनी अपुऱ्या किंवा अप्रामाणिक माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग माता आणि बालकांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी कटिबद्ध असून, दुर्गम भागातही रुग्णवाहिका सेवा, आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य यंत्रणा सतत कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.