
मुलचेरा : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल देवदा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मोरखंडी गावाला गुरुवारी (30 ऑक्टोबर) प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे आणि मध्ये नाला पडत असल्याने दुचाकीवरून प्रवास करत त्यांनी हे गाव गाठले. या पद्धतीने अनेक गावांना भेटी देत तिथे झालेल्या कामांची पाहणी त्यांनी केली.

तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सर्वप्रथम देवदा ग्रामपंचायत क्षेत्रातील मोरखंडी गावाला भेट दिली. मोरखंडीजवळ एमआरईजीएस अंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मोरखंडी गावातील गोटुल परिसरात ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील अंगणवाडी सेविकेसोबत गरोदर मातांच्या घरी जाऊन आरोग्य सुविधा आणि सेवा यांची विचारपूस केली. तसेच सुरू असलेल्या घरकुल बांधकामाची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या.
मोरखंडी हे गाव अतिदुर्गम भागात वसले आहे. तेथे जाण्यासाठी अजूनही पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात रस्त्यावरील नाल्यातून पाणी वाहत असल्याने चारचाकी वाहनाने जाणे कठीण होते. त्यामुळे गाडे यांना दुचाकीने प्रवास करत नाला पार करून मोरखंडी गाव गाठावे लागले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी मंगल डाखरे, ग्रामपंचायत अधिकारी आर.एम.टिंगुसले, सरपंच केसरी पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
































