चामोर्शी तालुका खविसंला उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रथम बक्षीस

फेडरेशनच्या वार्षित सभेत सन्मान

गडचिरोली : दि विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन नागपूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाला उत्कृष्ट कामासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री सुनील केदार व व्यवस्थापकीय संचालक हरीभाऊ यांच्या उपस्थितीत या बक्षिसाचा स्वीकार चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार व व्यवस्थापक नरेश घेर यांनी केला. यावेळी दि विदर्भ को-ऑप मार्केटिंग फेडरेशन गडचिरोलीचे व्यवस्थापक मामिडवार हेसुद्धा उपस्थित होते.

एकेकाळी लाखोंनी कर्जबाजारी असलेली ही संस्था अतुल गण्यारपवार यांच्या पुढाकाराने व संस्थेतील संचालक मंडळ, कर्मचारी, कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 15 वर्षांपासून उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्काराची मानकरी होत आहे. ही संस्था आज कर्जमुक्त असून शासनाकडेच या संस्थेचे कोट्यवधी रुपये थकित आहेत. यावर्षीचा संस्थेचा नफा 56 लाख रुपये आहे. या यशासाठी सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे.