गडचिरोली : दुकान गाळे बांधकाम आणि विक्री प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी माजी न.प.सभापती चंद्रशेखर भडांगे यांच्यावर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिले आहे.
यासंदर्भात तक्रारदार सुरेश पद्मशाली यांनी फसवणूक आणि जेष्ठ नागरिक संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी तक्रार पोलिसात केली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पद्मशाली यांनी न्यायालयात धाव घेतली. पद्मशाली यांच्यावतीने अॅड.सिद्धिक मंसुरी यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी गडचिरोली ठाण्याच्या पोलिस निरिक्षकांना तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
पद्मशाली यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस स्टेशनच्या मागे असलेल्या त्यांच्या प्लॅाटवर दुकान गाळे काढण्याचा सल्ला चंद्रशेखर भडांगे यांनी दिला आणि हे दुकान गाळे प्रत्येकी २० ते २५ लाख रुपयेप्रमाणे विकून देतो असे सांगितले होते. त्यानुसार सुरूवातीला २ गाळे बांधण्याचे ठरविण्यात आले. हे २ गाळे प्रत्येकी २० लाख रुपयेप्रमाणे मला द्या, मीच ठेवतो असे भडांगे म्हणाले. त्यामुळे पद्मशाली यांनी आणखी २ गाळ्यांचे बांधकाम केले. भडांगे यांनी केलेल्या अर्धवट बांधकामासाठी त्यांना रोख व चेकच्या स्वरूपात पद्मशाली यांनी १७ लाख ५३ हजार रुपये दिले आणि ते घेणार असलेले २ गाळे पूर्ण करून त्याचे ४० लाख रुपये देण्याची मागणी केली. मात्र भडांगे यांनी टाळाटाळ केली, असा पद्मशाली यांचा आरोप आहे. पुढे त्यांनी गाळ्यांचे बांधकामही पूर्ण केले नाही आणि गाळेही विकत घेतले नाही.
मी ६९ वर्षीय जेष्ठ नागरिक आहे. भडांगे यांनी पैसे कमविण्याचे आमिष दाखवून माझी आर्थिक फसवणूक केली आहे व मला मानसिक त्रास दिला आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करावी, अशी पद्मशाली यांची तक्रार आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गजानन तोटेवाड अधिक तपास करीत आहे.