गडचिरोली : माहितीच्या अधिकाराखाली दाखल करण्यात आलेल्या द्वितीय अपिलांवर निर्णय घेण्यासाठी राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची आज गडचिरोलीत विशेष सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची सुनावणी होणार असून यावेळी ते 100 अपिलांवर सुनावणी घेणार आहेत.
राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या सुनावणीत नागपूर खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव हे देखील उपस्थित राहून जिल्ह्यातील विविध सार्वजनिक प्राधिकरणांशी संबंधित सुमारे 100 द्वितीय अपील प्रकरणांवर सुनावणी घेणार आहेत.
या सुनावणीदरम्यान प्रलंबित अपील प्रकरणांवर प्रभावी निर्णय घेत नागरिकांना माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीत न्याय देण्याचा उद्देश आहे. त्यामुळे संबंधित द्वितीय अपिलकर्त्यांनी, तसेच संबंधित सार्वजनिक प्राधिकरणांचे अधिकारी / प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन राज्य माहिती आयोगाच्या उपसचिव रोहिणी जाधव यांनी केले आहे.