चामोर्शी : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी मंगळवारी (दि.20) चामोर्शी तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडा मंदिरास भेट देऊन तेथे सुरू असलेल्या जिर्णोद्धार आणि विविध विकासकामांची पाहणी केली. मंदिराच्या ऐतिहासिक वारशाला साजेशा पद्धतीने, दर्जेदार व कालबद्ध रितीने ही कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.
मुख्य सचिवांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासह परिसरातील घाट, वाहनतळ, उद्यान (बगिचा), स्वच्छतागृह तसेच अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या कामांदरम्यान येणाऱ्या अडचणी, तांत्रिक बाबी तसेच पुढील टप्प्यातील नियोजन याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी बिदरी, पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, पुरातत्त्व अधिक्षक अरुण मलिक, तसेच सहायक जिल्हाधिकारी एम.अरुण प्रामुख्याने उपस्थित होते.
सादरीकरणातून सांगितली होणारी कामे
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता समय निकोसे यांनी सादरीकरणाद्वारे मंदिराच्या बाह्य परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची सविस्तर माहिती दिली. मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाचे सुमारे 50 टक्के काम पूर्ण झाले असून, रस्ता, वाहनतळ व स्वच्छतागृहांची कामे सध्या प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या टप्प्यात नदीघाटाचे प्रवेशद्वार, तसेच इतर पूरक विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू यांनी मंदिराची दुरुस्ती व जतन याविषयी माहिती दिली, तर अभ्यासक शिवाली शर्मा यांनी मार्कंडा मंदिराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व वास्तुशास्त्रीय महत्त्वाबाबत सविस्तर माहिती दिली.
































