गडचिरोली : प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी दिलेल्या सूचनेनुसार, गडचिरोली जिल्ह्यात पुढील पाच दिवसात अंशतः ढगाळ हवामान राहून दि.29 व 30 ऑक्टोबर रोजी सर्वत्र हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही बरसणार आहे. याशिवाय दि.31 रोजी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम आणि दि.1 व 2 नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

आज आणि उद्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा, तसेच मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अनेक शेतकऱ्यांकडून धान कापणी सुरू आहे. कापलेल्या धानाच्या कडपा शेतात वाळवण्यासाठी ठेवल्या जातात. अशात त्या पावसात सापडल्यास धान खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला कृषी विज्ञान केंद्राने दिला आहे.
































