गडचिरोली : जिल्ह्यातील प्रश्नांकडे तातडीने लक्ष वेधता यावे यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत पालकमंत्री सहायता कक्ष स्थापन करावा, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस यांनी त्यांना निवेदन देऊन केली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी गडचिरोलीत आले असताना या मागणीचे निवेदन त्यांना दिले. रेखा डोळस यांनी पोलिस विभागाच्या हेलिपॅडवर पुष्पगुच्छ देऊन महिला आघाडीच्या वतीने त्यांचे स्वागत केले.
गडचिरोली जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या मुख्यालयी अनुपस्थित राहतात, ही बाब गंभीर असून यावर राज्य सरकारच्या वतीने तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली. तसेच गडचिरोली जिल्ह्य आदिवासीबहुल, उद्योगविरहित जिल्हा असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या लोकनेत्याच्या आधाराची नितांत आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यचे पालकमंत्रीपद ना.देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे अशी प्रथम मागणी रेखा डोळस यांनी केली होती. त्याला प्रतिसाद देत ना.फडणवीस यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. महाराष्ट्र राज्य अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राज्य सरकारद्वारे 77 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. सदर रक्कम समस्त सहकारी संस्थांना वाटप करण्यात येणार आहे. याबद्दल राज्य सरकारचे त्यांनी आभार मानले.