


गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून ‘गडचिरोली महोत्सव’ सुरू झाला आहे. तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता साधली जात असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
गडचिरोली पोलीस विभागाच्या पुढाकाराने आयोजित गडचिरोली महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, तसेच गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, माजी खासदार डॅा.अशोक नेते, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, तसेच लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाने एकीकडे माओवादाविरोधात निर्णायक लढा देत जिल्ह्याला जवळपास पूर्णपणे मुक्त केले, तर दुसरीकडे लोकाभिमुखतेतून महसूल प्रशासनासोबत समन्वय साधत राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले. “आज गडचिरोली जिल्ह्याने भरारी घेतली आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग, पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात जिल्ह्याची झपाट्याने प्रगती होत आहे. पुढील 10 वर्षांत गडचिरोली महाराष्ट्रातील पहिल्या पाच जिल्ह्यांत असेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक निलोत्पन यांनी केले.
विविध स्पर्धेतील विजेते आणि त्यांचे बक्षीस
गडचिरोली महोत्सवामध्ये आदिवासी समूह नृत्य स्पर्धा, वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धा व बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दुर्गम व अतिदुर्गम भागातून आलेल्या संघांमध्ये अत्यंत चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. यातील वीर बाबुराव शेडमाके कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम- जय सेवा कबड्डी संघ धानोरा, द्वितीय- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळ, आष्टी आणि तृतीय क्रमांक- युवा मंडळ संघ, साखेरा यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 35,000 रुपये, 30,000 रुपये आणि 25000 रुपये रोख, ट्रॉफी, पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यासोबतच भगवान बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये प्रथम- जय बजरंग व्हॉलीबॉल क्लब डुम्मे, ता.एटापल्ली, द्वितीय- स्पंदन फाऊंडेशन क्लब, गडचिरोली व तृतीय क्रमांक- आर.डी. क्लब अहेरी यांनी पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे 35,000 रु., 30,000 रु. व 25000 रु. रोख, ट्रॉफी, पदक देण्यात आले.
कलावंतांनी प्रेक्षकांना रिझविले
या महोत्सवामध्ये जिल्ह्रातील विविध बचत गट आणि विविध संस्थांनी आपल्या उत्पादनांचे व वस्तुंचे स्टॉल लावले होते. त्यातून 25 ते 30 लाख रुपयांची आर्थिक उलाढाल झाली. यासोबतच दि.26 व 27 डिसेंबर रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रसिध्द गायक सुरेश वाडकर, तसेच हास्य अभिनेते भारत गणेशपूरे, कुशल बद्रिके, हेमांगी कवी, ममता उईके, अर्जुन धोपटे, निरंजन बोबडे, नृत्यांगणा माधुरी पवार, तसेच पद्मनाभन गायकवाड, आरजे आरव व रसिका यांच्यासह गडचिरोली जिल्ह्रातील स्थानिक कलाकारांनी सुद्धा सहभाग घेत प्रेक्षकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मान्यवरांनी दि.27 च्या रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केली गझल
या सांस्कृतिक रजनीदरम्यान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी हिंदी गझल सादर करून आपल्यातील गायक कलावंताचा परिचय दिला. त्यांच्या गझलेला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रशासकीय कामकाजातील ताण कमी करत या गडचिरोली महोत्सवाने अधिकारी-कर्मचाऱ्यांसह गडचिरोलीकरांचा विरंगुळा केला.
या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस अधीक्षक (धानोरा) अनिकेत हिरडे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे सर्व प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी तथा अंमलदारांनी परिश्रम घेतले.
































