गडचिरोली : गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून असलेले ढगाळ वातावरण आता बरेच निवळले असल्याने पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. गडचिरोलीत पारा 10 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे गरम कपड्यांसह रात्रीच्या सुमारास लोक शेकोटीतून ऊब मिळवण्याचा प्रयत् करत असल्याचे दिसून येते.
गेले 15 दिवस ढगाळ वातावरण होते. काही भागात अवकाळी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे तूरपीकासह इतर काही पिकांवर दु्ष्परिणाम झाला. मळणी केलेल्या धानातही ओलावा असल्याने खरेदी केंद्रांवर तो नाकारला जात होता. याचा फटका गरजवंत शेतकऱ्यांना बसला. पण आता ढगाळ वातावरण निवळून ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जंगलांनी वेढलेल्या ग्रामीण भागात थंडीचा जोर जास्त जाणवतो. त्यामुळे आता रात्रीच्या वेळी शेकट्यांच्या भोवती बसून गप्पा रंगत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.