कमी गुंतवणुकीत अधिक नफा हवा असल्यास ‘या’ व्यवसायाकडे वळा

जिल्हाधिकाऱ्यांचे युवकांना आवाहन

मध संकलनाचे प्रात्याक्षिक अनुभवताना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली : मधमाशी पालन हा कमी गुंतवणुकीत अधिक नफा देणारा, पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय आहे. जिल्ह्यातील तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी स्वावलंबनासाठी व आर्थिक उन्नतीसाठी मधमाशीपालनाचा व्यवसाय करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाअंतर्गत गडचिरोलीच्या कृषी विज्ञान केंद्रात “शास्त्रोक्त मधमाशीपालन प्रशिक्षण” या 7 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी पंडा प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत होते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विभाग, महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय मधमाशी मंडळ नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 20 ते 26 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करताना, मधमाशी पालनातून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन वरिष्ठ शास्त्रज्ञ व केंद्राचे प्रमुख डॉ.किशोर झाडे यांनी केले. त्यांनी प्रशिक्षणाचा आढावा सादर करताना, या सात दिवसांच्या कालावधीत प्रशिक्षणार्थींना मधमाशीपालनाचे सखोल ज्ञान व प्रात्यक्षिके देण्यात आल्याचे सांगितले.

प्रशिक्षणादरम्यान मध, मेण, राजान्न, पोलन इत्यादी उत्पादनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संधींबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील विषयतज्ज्ञ व अनेक शेतकरी उपस्थित होते. आभार प्रदर्शन सूचित के. लाकडे यांनी केले.