गडचिरोली : जिल्ह्यात काही प्रमुख खत वितरक चढ्या दराने खतांची विक्री करत असल्याच्या आणि खत लिंकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याची गांभिर्याने दखल घेतली. यंत्रणेची बैठक घेऊन अशा वितरक आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी पंडा यांनी खत कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच मोठे आणि लहान वितरक यांच्यासोबत जिल्ह्यातील खतांची उपलब्धता आणि वितरणाचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात खतांची उपलब्धता सुरळीत राहावी याची दक्षता घेण्याचे निर्देश देत शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री गोकुल, सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, रणजित यादव, नमन गोयल आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी अवंटीत केलेले खत पूर्णपणे याच जिल्ह्यात उपलब्ध झाले पाहिजे आणि ते इतर जिल्ह्यात वळविण्यात आल्यास कारवाईच्या सूचना दिल्या. खतांची सध्याची मोठी मागणी लक्षात घेता, बफर स्टॉकमधील खत तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मागणी नसतानाही अनावश्यक इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती करू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. खत कंपन्यांनी खतांच्या रॅक कधी लावल्या जातील, याची पूर्वसूचना प्रशासनाला द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

































