जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटीसवर देसाईगंज तहसीलदारांचे मौन

कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका

देसाईगंज : येथील तहसीलदार प्रिती डुडूलकर यांना शासकीय कामकाजात दिरंगाई आणि शिस्तपालन न केल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 30 आॅक्टोबरला ही नोटीस बजावत तीन दिवसात उत्तर मागविले, पण सोमवार, दि.3 पर्यंत त्यांचे उत्तर आले नसल्याचे कळते.

यासंदर्भात डुडुलकर यांना विचारणा करण्यासाठी कॅाल केला असताना त्यांनी कॅालही स्वीकारला नाही. त्यामुळे त्यांच्या या मौन मागे नेमके कोणते कारण आहे हे कळू शकले नाही.

वरिष्ठांची परवानगी न घेता मुख्यालय सोडणे, नागरिकांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे या मुद्द्यांवर ही कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. शनिवार, रविवार आणि सुटीच्या दिवशी तहसीलदार मुख्यालयी अनुपस्थित राहतात, आणि वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता मुख्यालय सोडतात, असाही ठपका ठेवण्यात आला आहे.

पुढील काळात अशा तक्रारी आल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.