निवडणुकीचा माहौल बनवायचा आहे?  पण आधी या निर्बंधांवर नजर टाका

वाहनावरच्या झेंडा, बॅनरसाठीही नियम

गडचिरोली : निवडणुकीची अधिसूचना जारी होण्यास आता अवघे चार दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर नामांकन दाखल करण्यास सुरूवात होईल. त्यामुळे ज्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरायचे आहे त्यांच्याकडून नामांकन दाखल करण्यासाठी जाताना कसा माहौल बनवायचा यापासून तर प्रचाराच्या रणनीतीपर्यंतचे प्लॅनिंग सुरू आहे. पण हे करताना जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जारी केलेल्या विविध निर्बंधांवर नजर टाकणे आवश्यक आहे. त्या निर्बंधांकडे दुर्लक्ष केल्यास आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यात विविध बाबींवर निर्बंध लागू केले आहे. निर्बंध आदेश निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहेत. संबंधित सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दैने यांनी केले आहे.
नामनिर्देशन दाखल करताना हे लक्षात ठेवा
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या / वाहनांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्तीव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक / सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध राहणार आहे.
वाहनांवर झेंडा, बॅनर कसे लावणार?
निवडणूक प्रचार मोहीमेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांच्या  वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक, झेंडे लावतात.  पण त्यासाठीही नियम सांगण्यात आले आहे. फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंडस्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासुन 2 फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावे, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही. तसेच फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर लावता येणार नाही.
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणास प्रतिबंध 
नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होर्डीग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीरात प्रदर्शित करताना स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते दुर(नष्ट) करून ईमारती, मालमत्ता पुर्ववत करुन घेणे, जाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय / निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.
नमुना मतपत्रिका छपाई करता येणार नाही
राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा हितचिंतक यांनी तसेच मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमांद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने इतर उमेदवाराचे नाव व त्यांना नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मत पत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे व आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध आहे.
तात्पुरती प्रचार कार्यालये स्थापन्यापूर्वी हे वाचा
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी प्रचार कार्यालये स्थापन करताना वर नमुद बाबी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. निवडणूक काळात जिल्ह्यात कुठेही जात, भाषा, धार्मिक शिबिरांचे, मेळाव्यांचे आयोजन करता येणार नाही.
ताफ्याचा 10 पेक्षा जास्त वाहनांच्या वापरावर निर्बंध 
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटारगाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध राहणार आहे. तसेच  निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधीकाऱ्यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 पूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनीक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. याशिवाय रहदारीस अडथळा निर्माण करणारे प्रचार साहित्य लावण्यास मनाई करण्यात आली आहे.