गडचिरोली : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी डॅा.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील आदर्श केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. प्रत्येक मतदार संघातील आदर्श, सखी आणि दिव्यांग मतदान केंद्रावरील सजावटीने मतदारांचे लक्ष वेधून घेतले.
मतदान केंद्रासारखे जबाबदारी काम महिला, दिव्यांग हेसुद्धा चांगल्या प्रकारे सांभाळू शकतात हा संदेश समाजात जाण्यासाठी सर्व मतदार संघांमध्ये प्रत्येकी एक सखी मतदान केंद्र आणि दिव्यांग मतदान केंद्र होते. त्या केंद्रांवर आकर्षक सजावटीसह सेल्फी स्टँड लावले होते. मतदार मतदान करून आल्यानंतर मोठ्या उत्साहाने त्या फ्रेममध्ये आपला फोटो काढून घेत होते.
गडचिरोली पंचायत समितीच्या आवारातील सखी मतदान केंद्रात केंद्राध्यक्ष आणि कर्मचाऱ्यांपासून आतील सुरक्षेसाठी तैनात पोलीस शिपायापर्यंत सर्व महिलाच होत्या. विशेष म्हणजे केंद्रावरील सर्व सजावट गुलाबी रंगात केली होती.
सेल्फी स्टँडवर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
काही प्रमुख मतदान केंद्रांवर मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सेल्फी स्टँड लावण्यात आले होते. त्या स्टँडवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांचे छायाचित्र रेखाटले होते. त्यामुळे हे स्टँड (फ्रेम) आणखीच आकर्षक वाटत होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली ज्येष्ठ नागरिकाला मदत
जिल्हाधिकारी संजय दैने यांनी सपत्निक मतदान केल्यानंतर सेल्फी स्टँडवर फोटोही काढून घेतला. त्यानंतर परत निघाले असताना मतदान केंद्राच्या गेटवर आलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला स्वत: मार्गदर्शन केले. त्यांच्याकडील स्लिप पाहून त्यांच्या केंद्रात सोडून दिले. ज्येष्ठ नागरिकांसोबत कसे वागावे याचा आदर्श त्यांनी आपल्या वागणुकीतून दिला.