Home दैनंदिन बातम्या देसाईगंज तालुक्यातील कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

देसाईगंज तालुक्यातील कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

पाणीपुरवठा योजनेच्या कामावर नाराजी

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी (दि.8) देसाईगंज (वडसा) तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि उपजीविकेसाठी राबविल्या जाणाऱ्या स्थानिक उपक्रमांची पाहणी करत आढावा घेतला. या दौऱ्यात पाणीपुरवठा, कृषी, सूक्ष्म अन्नप्रक्रिया तसेच पायाभूत सुविधा यावरील महत्त्वाच्या प्रकल्पांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) स्मिता बेलपत्रे यांनीही आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित ठिकाणी भेटी देऊन विविध बाबींची पाहणी करत सर्वंकष आढावा घेतला.

पाणीपुरवठा योजनेवर नाराजी

देसाईगंज नगरपरिषदेअंतर्गत सुरू असलेल्या सुमारे 60 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना कामाच्या संथगतीवर जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत कामाला गती देऊन ठरलेल्या वेळापत्रकानुसार ती पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित, सुरक्षित व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध करण्यासाठी नियोजन अधिक प्रभावी करण्यावरही त्यांनी भर दिला.

कृषी प्रकल्पांना प्रोत्साहन

कृषी क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शेडनेट व पॉलीहाऊस प्रकल्पांना भेट दिली. विविध कृषी योजनांच्या एकत्रित अंमलबजावणीद्वारे तसेच शेतकऱ्यांनी स्वखर्चातून उभारलेल्या रोपवाटिका पॉलीहाऊसची त्यांनी पाहणी केली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादन व उत्पन्न वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अन्नप्रक्रिया व स्थानिक उपक्रमांची पाहणी

सावंगी येथील डाळ मिलला भेट देत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सुरू असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उपक्रमाची पाहणी केली. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी अशा उपक्रमांना चालना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक उत्पादकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

त्यानंतर विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्पला भेट देऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत चर्चा केली. तसेच जवानांच्या सुविधा व कार्यपद्धतीची सविस्तर माहिती घेतली.

या दौऱ्यात त्यांनी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सुरू असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यटन पार्कच्या कामाचीही पाहणी केली. तसेच तलाठी दफ्तर, शाळा व इतर विकास कामांची पाहणी करण्यात आली. स्थानिक प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख राहण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी प्रसेनजित प्रधान, तहसीलदार प्रिती डुडूलकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.