आता गोसीखुर्दचे पाणी अडविणार मार्ग, जिल्हाधिकारी-एसपींनी केली हवाई पाहणी

पहा हेलिकॅाप्टरमधून दिसणाऱ्या पुराचा व्हिडीओ

गडचिरोली : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती पावसाच्या उसंतीनंतर काहीशी सावरली, मात्र गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढविल्यामुळे वैनगंगेसह उपनद्यांमध्ये पुन्हा पाणी चढत आहे. परिणामी मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरू झालेले काही मार्ग बुधवारी पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान मेडीगड्डा बॅरेज आणि प्राणहिता नदीच्या पुरामुळे सिरोंचा विभागात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची जिल्हाधिकारी संजय दैने आणि जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी मंगळवारी हेलिकॉप्टरमधून पाहणी केली. त्यांनी गोदावरी व प्राणहिता नदीसह धर्मपुरी पुलाची पाहणी केली. यावेळी पुराचे पाणी नदीपात्र सोडून लगतच्या शेतांमध्ये पसरल्याचे दिसून आले.

जिल्हाधिकारी दैने यांनी पुरपरिस्थिती ओसरल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांसंबंधी सिरोंचा तहसील कार्यालयात तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेतला. साथरोग पसरू नये याची काळजी घेणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहित पद्धतीने स्वच्छ करणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पूर पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना गर्दी करण्यापासून परावृत्त करणे, नदीकाठी असलेल्या गावातील नागरिकांना गरजेनुसार आश्रयगृहात स्थलांतरित करण्यासाठी तत्पर राहणे, विजा चमकत असताना झाडाखाली आश्रय न घेण्याबाबत जनजागृती करणे आदी बाबींवर जिल्हाधिकारी यांनी यंत्रणेला सूचना दिल्या.

याप्रसंगी जिल्हा आपत्ती सल्लागार कृष्णा रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक, गटविकास अधिकारी अनिलकुमार पटले, तहसीलदार तोटावार, तसेच तालुकास्तरीय यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पुलांवर पाणी चढल्याने खालील 13 मार्ग बंद आहेत.

1) अहेरी-देवलमारी-मोयाबीनपेठा रस्ता (वट्रा नाला, देवलमारी नाला, ता.अहेरी)
2) लखमापूर बोरी-गणपूर (हळदीमाल नाला) ता.चोमोर्शी
3) भेंडाळा-अनखोडा रस्ता (ता.चामोर्शी)
4) फोर्कुडी-मार्कंडादेव रस्ता (ता.चामोर्शी)
5) भाडभिडी-रेगडी-देवदा रस्ता (ता.चामोर्शी)
6) चामोर्शी-फराळा-मार्कडादेव (ता.चामोर्शी)
7) वैरागड-देलनवाडी रस्ता (ता.आरमोरी)
8) आरमोरी अंतरंगी जोगीसाखरा रस्ता (ता.आरमोरी)
9) मानापूर-नंदा-कलकुली रस्ता (ता.आरमोरी)
10) मौशीखांब-वडधा रस्ता (ता.वडसा)
11) गडचिरोली-चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग (शिवणी नाला) ता.गडचिरोली
12) झिंगानूर-कल्लेड-देचलीपेठा रस्ता (ता.सिरोंचा)
13) आलापल्ली-आष्टी राष्ट्रीय महामार्ग (दिना नदी)