गडचिरोली : बांगलादेशात हिंदू आणि तेथील सर्व अल्पसंख्यांक समाजावर कट्टवाद्यांकडून होत असलेल्या विविध अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मंगळवारी गडचिरोलीत सकल हिंदू समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून न्याय यात्रा काढली. शिवाजी कॅालेज ते देवकुले मैदानापर्यंत काढलेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने महिला आणि सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते.
हाती भगवे झेंडे घेऊन आणि ‘जय श्रीराम’ असा जयघोष करत ही न्याययात्रा देवकुले मैदानावर पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभा झाली. बांगलादेशातील परिस्थिती बदलण्यासाठी केंद्र सरकारने दबाव टाकावा यासाठी एक निवेदनही पाठविण्यात आले.
या न्याय यात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक जयंत खरवडे, कीर्तनकार सविता खरवडे, माजी आ.डॅा.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, ज्येष्ठ नेते किशन नागदेवे, गोवर्धन चव्हाण, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, प्राचार्य लालसिंग खालसा, संकेत भानारकर, परमेश्वर दास, मुरलीधर महाराज, अविनाश ताडपल्लीवार, प्रशांत तम्मेवार, संजय शेंडे, प्रकाश तोडेवार यांच्यासह शहरी व ग्रामीण भागातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अशाच पद्धतीची न्याय यात्रा सिरोंचा येथेही काढण्यात आली.