गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) विमान दुर्घटनेत बारामती येथे निधन झाल्यानंतर राज्यावर शोककळा पसरली आहे. राजकारणासह समाजकारणातही दैदिप्यमान असलेल्या या व्यक्तिमत्वाला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शोकसंवेदना व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक इंदिरा गांधी चौक परिसरातील राजीव गांधी खुल्या सभागृहात गुरुवारी (दि.29) सायंकाळी 5 वाजता ही सर्वपक्षीय शोकसभा होणार आहे. या शोकसभेला सर्वच पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवंगत अजितदादा पवार यांच्याप्रती आपल्या शोकसंवेदना व्यक्त कराव्या, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले आहे.
































