बोधिसत्व बुद्ध विहारात संविधान सन्मान दिनानिमित्त मार्गदर्शन

उद्देशिकेचे केले सामूहिक वाचन

अहेरी : बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ अहेरी तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा गडचिरोली (दक्षिण) यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबरला “भारतीय संविधान सन्मान दिन” साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधान जनजागृती प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार सदाशिव झाडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अॅड.उदयप्रकाश गलबले, प्रा.रमेश हलामी, प्राचार्य विष्णू सोनोने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प.) सेवादलाचे अहेरी तालुका अध्यक्ष बुधाजी सिडाम, प्रा.देविदास घोडेस्वार, जेष्ठ उपासिका आयुष्यमती लीलाबाई दहागांवकर इत्यादी उपस्थित होते.

महाकारुनिक तथागत बुद्ध, बोधिसत्व महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व उपस्थितांनी उभे राहून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. हेमंत बोरकर यांनी सुमधुर आवाजात प्रबोधनपर संविधान गीत सादर करून मंत्रमुग्ध केले.

मार्गदर्शनात अॅड.उदयप्रकाश गलबले यांनी संविधानिक तत्वे, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, सध्या संविधानिक मूल्ये पायदळी कशी तुडवली जात आहेत याची विविध उदाहरणे दिली. तसेच प्रा.हलामी यांनी भारतीय संविधानाने नागरिकांना मिळालेले आरक्षण, सवलती कशा प्रकारे कमी केल्या जात आहे. सरकारी नोकरी संपुष्टात आणून समाजात सामाजिक, आर्थिक विषमता निर्माण होत असल्याची भावना व्यक्त केली. प्राचार्य विष्णू सोनोने यांनी प्रत्येक नागरिकांचे मूलभूत हक्क अप्रत्यक्षरित्या हिरावले जाऊन सामाजिक व आर्थिक विषमता वाढत असल्याचे सांगितले. बहुजन वर्गाने संघटीत होऊन आपल्या अधिकारांचे रक्षण करावे, असे ते म्हणाले.

जेष्ठ कार्यकर्ते बुधाजी सिडाम यांनी आपल्या खास शैलीत सामाजिक व राजकीय विषयावर मते मांडली. अध्यक्षीय मार्गदर्शनातून सदाशिव झाडे यांनी सामाजिक संघटन मजबूत करून एकसंघ समाज होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा अहेरीचे तालुका संघटक राहूल गर्गम यांनी तर अध्यक्ष दामोधर राऊत यांनी मार्गदर्शक, मंडळाचे पदाधिकारी आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी बोधिसत्व बहुउद्देशिय विकास मंडळाच्या वतीने बिस्किट आणि चहाचे सर्वासाठी वितरण करण्यात आले.