‘खोब्रागडी’च्या पुलाची दुरूस्ती कंत्राटदार स्वखर्चाने करणार

क्षतीग्रस्त खांब नव्याने उभारणार

गडचिरोली : कोरची तालुक्यातील सावरगाव-कोटगुल – गोंदरी– बेतकाठी (गांगीन) नाडेकल ते रामा या मार्गावरील खोब्रागडी नदीवर अतिदुर्गम भागात सुरू असलेल्या मोठ्या पुलाचा एक खांब (पी-5) क्षतीग्रस्त झाला आहे. बांधकाम करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कंत्राटदाराने तो खांब व स्लॅब स्वतःच्या जोखमीवर व खर्चावर काढून नव्याने मजबूत पाया उभारण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कंत्राटदारास देण्यात आले आहे. कंत्राटदारने हे काम पूर्ण करण्याचे हमीपत्र दिले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मोरे यांनी सांगितले.

54 मीटर लांब असलेल्या या पुलाच्या बांधकामास ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 2018 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. पुलाचे खांब व स्लॅबचे काम जुलै 2022 पासून सुरू करण्यात येऊन जुलै 2023 पर्यंत पूर्ण झाले होते. मात्र, सन 2022-23 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीच्या प्रवाहात मोठे झाड व झुडूपांचा अडथळा निर्माण होऊन प्रवाह बदलल्याने पुलाचा खांब क्रमांक 5 हा कमकुवत झाला. ऑगस्ट 2024 मधील तपासणीच्या आधारे याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या क्षतीग्रस्त खांबाच्या पुर्नबांधकामासाठी कंत्राटदाराला नोटीस बजावली होती. (अधिक बातमी खाली वाचा)

दोषनिवारण कालावधीत सदर पुलाचे खांब व स्लॅब कंत्राटदाराने स्वतःच्या जोखमीवर व खर्चावर काढून टाकावा व नव्याने मजबूत पाया उभारावा, असे स्पष्ट निर्देश बांधकाम विभागामार्फत देण्यात आले आहेत. हे काम पावसाळ्यानंतर 15 ते 20 दिवसांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.