गडचिरोली : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांनी बँकांमधून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन यंत्रणा उभी केली. अनेक वाहने आणि मोठमोठ्या मशिनरी खरेदी केल्या, यातून जिल्ह्यातील सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार दिल्या जात आहे, मात्र सध्या एका कंपनीने अनुभव नसतानाही गडचिरोली जिल्ह्यातील कंत्राटदारांच्या हातातील कामे स्वतःकडे घेऊन कामे सुरू करण्याचा घाट रचला आहे. या प्रकाराला आळा घालून जिल्ह्यातील शासकीय कामे जिल्ह्यातीलच कंत्राटदारांना द्यावी, अशी मागणी दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटनेने केली आहे.
एका कॉन्ट्रॅक्टर कंपनीने जिल्ह्यात सध्या एका माजी अधीक्षक अभियंता व बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक कंत्राटदारांची कामे हिरावून घेण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू केला आहे. जिल्ह्यात बोगस कामे करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, अशी भूमिका सदर कंत्राटदार संघटनेने घेतली आहे. वेळ पडल्यास कंत्राटदार संघटनेच्या वतीने रस्त्यावर सुद्धा उतरण्याची तयारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दर्शवली आहे. संघटनेने पत्रकार परिषद घेऊन आणि नारेबाजी करून आपल्या भावना व्यक्त केल्या.
संबंधित कंपनीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान सुरू असल्याचा आरोप यावेळी दक्षिण दंडकारण्य कंत्राटदार संघटनेचे सल्लागार प्रणय खुणे यांनी पत्रकार परिषदेत केला. बांधकाम विभागाने केलेले पाच कंत्राट रद्द करावे, अशी मागणीही संघटनेने केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष साईनाथ बोंम्मावार, सचिव अरुण मुक्कावार, मार्गदर्शक डॉ.प्रणय खुणे, अरविंद कात्रटवार, नाना नाकाडे, सल्लागार नितीन वायलालवार, सहअध्यक्ष धनंजय पडीशाला, सहसचिव राकेश गुब्बावार, प्रवक्ता अश्विन मेड्डीवार, सहसचिव गौतम अधिकारी, राजू मेहता, अजय तुम्मावार, सुकलाल सरकार, मंगेश देशमुख, मनोज पवार, रमेश गंपावर, अजय गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.